तोरणा गड
- तुषार कुटे, नाशिक
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेला हा किल्ला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. महाराजांनी या गडाला प्रचंडगड असे नाव दिले होते. त्यामुळे हा किल्ला किती मोठा असेल याची कल्पना येते. पुणे जिल्ह्यातील सर्वांत उंच गड म्हणून तोरणा नावाजलेला आहे. पुण्यापासून 42 किलोमीटर अंतरावर वेल्हे गावात व याच तालुक्यात हा किल्ला आहे. सिंहगड रस्ता संपल्यावर सिंहगडच्या पायथ्याशी उजव्या बाजूला एक खानापूरकडे जाणारा रस्ता लागतो. त्या रस्त्याने वेल्हे गावाकडे जाता येते. हा रस्ता पुढे राजगडाला जाऊन मिळतो. सिंहगडापासून तोरणा किल्ला 22 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याला लागणाऱ्या बावे या गावापासून डावीकडे राजगडला तीन कि.मी. तर उजवीकडे पाच कि.मी. तोरणा किल्ला आहे. गाडी केवळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतच जाऊ शकते. स्वतःची गाडी असेल, तर उत्तम. पावसाळ्यात तोरणा किल्ला पाहण्याची मजा काही औरच. पावसाळी वातावरणात पायथ्यापासून बुरूज दिसणे अवघड असते. किल्ल्याचा बुरूज पूर्णपणे धुक्याने वेढलेला असतो. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंच हा गड आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगराची चढाई फारशी कठीण नाही. खरा कस लागतो, तो मूळ किल्ला चढण्यातच. उंचावरून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना सामोरे जाताना दमछाक होते. मूळ किल्लाही चढाईला थोडा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. तोरणा किल्ल्यावर पोचण्यास दोन तास लागतात. पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर हिरवागार झालेला असतो. त्यामुळे अधिक प्रसन्न वाटते. किल्ल्यावरील तोरणजाई मंदिर, मेंगाई मंदिर, बुधलामाची, झुंजारमाची ही ठिकाणे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
- तुषार कुटे, नाशिक
मूळ लेख इथेही पाहता येईल.
No comments:
Post a Comment